पथदर्शी कार्यक्रमात सुरज मांढरे यांनी नाशिक जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानी नेले. विभागीय आयुक्तराधाकृष्ण गमे.
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना भावपूर्ण निरोप. गंगाधर डी यांचे जल्लोषात स्वागत.
नाशिक जनमत राज्य शासनाचे अनेकविध पथदर्शी कार्यक्रम जिल्ह्यात सूरज मांढरे यांनी यशस्वीपणे राबविले आहेत. जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना श्री. मांढरे यांनी पथदर्शी कार्यक्रमांत नाशिक जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान प्राप्त करून दिले आहे, ही अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. त्यांचे हे काम प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. आज राज्याचे शिक्षण आयुक्त तथा माजी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा निरोप समारंभ आणि नव्याने पदस्थापना झालेले जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या स्वागत समारंभाच्या आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, श्री. मांढरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. मयुरा मांढरे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, विभाग प्रमुख, तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, विधानसभा, लोकसभा निवडणूक काळातील श्री. मांढरे यांचे काम उत्तम होतेच. परंतू कोरोना सारख्या महामारीच्या काळातही श्री. मांढरे यांनी सर्वच परिस्थितीचे योग्य नियोजन करून अतिशय संवेदनशीलपणे काम केले आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन असो किंवा जिल्ह्याला ऑक्सिजनच्या बाबती स्वयंपूर्ण करण्यासाठीचे यशस्वी प्रयत्न उल्लेखनीय आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या काळात देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवा यासाठी देखील त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. काळाची पावले ओळखून त्यांनी तंत्रज्ञानाच्या साथीने जिल्हा प्रशासनात अनेक अमुलाग्र बदल करून पेपरलेस ऑफीस बनविण्यावर त्यांनी भर दिला आहे. याचप्रमाणे श्री. मांढरे यांना बदलीने मिळालेले राज्याचे शिक्षण आयुक्त पदाच्या कामकाजातून देखील ते त्यांच्या कुशल नेतृत्वाने शिक्षण विभागाला गतवैभव प्राप्त करून देतील अशी अपेक्षा व्यक्त करून विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी श्री. सूरज मांढरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. *टिमवर्कमुळे नियोजनबद्ध व पारदर्शकतेने काम करणे झाले शक्य : सूरज मांढरे* प्रशासकीय सेवेत काम करतांना कोणतीही व्यक्ती श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. आपल्या पदाची गरिमा सांभाळून प्रामाणिकपणे काम करणे महत्वाचे आहे. या तत्वानुसार मी नाशिक जिल्ह्यात माझ्या टिमच्या माध्यमातूनच नियोजबद्ध व अधिक पारदर्शकपणे काम करू शकलो अशा भावना आज राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी निरोप समारंभ प्रसंगी व्यक्त केल्या आहेत. श्री. मांढरे यावेळी म्हणाले की, नाशिकमध्ये काम करतांना सर्वच यंत्रणांकडून मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे कोरोना संकट काळात त्याचप्रमाणे निवडणूकीच्या काळात मी अधिक प्रभावीपणे व पूर्ण क्षमतेने काम करून शकलो. प्रशासनात काम करतांना कामाच्या स्वरूपानुसार अधिकारी व कर्मचारी यांचे मुल्यांकन केल्यास ते अधिक प्रभावी ठरते याचा प्रत्यक्ष अनुभव नाशिकमध्ये काम करतांना आला. कोरोना काळात साथरोग कायदा लागू केला त्याचप्रमाणे मजूरांसाठी कॅम्प्सचे आयोजन करून नियोजित स्थळी त्यांना पोहचविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले असून, यामुळे जिल्ह्याची प्रतिमा उंचावली आहे. राज्यस्तरीय बैठकांमध्ये नाशिकचा उल्लेख प्रथम स्थानी घेतेले जाते. नाशिकमध्ये काम करतांना, वरिष्ठांचा स्नेहासोबतच कामातील उणीवा त्यावर मार्गदर्शक सूचना हे कायम लाभले आहे. शासकीय मदत दूत हा उपक्रम राबवितांना जिल्ह्याचा संवेदनशील प्रशासन म्हणून गौरव झाला ही बाब गौरवास्पद आहे. नाशिकच्या कार्यकाळात पालकमंत्री, लोकप्रतिनीधी व नागरिक यांचे सहकार्य कायम स्मरणात राहील. शासकीय नोकरी करतांना स्वत:चा व्यासंग महत्वाचा असून व्यक्ती म्हणून आपला उपयोग झाला पाहिजे, असे काम प्रत्यकाने करावे अशी अपेक्षा आज सूरज मांढरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. *कोरोना काळातील नियोजन आदर्श: गंगाथरन डी.* यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले की, कोरोना काळात जिल्हा प्रशासनाचे नियोजन हे आदर्श असून, नाशिक सर्वच स्तरावर अव्वल स्थानावर राहीले आहे. महसूल विभागात आर्थिक वर्षातील महसूल वसूलीची उद्दीष्टपूर्ती करणे आव्हानात्मक काम असते, परंतु हि उद्दीष्टपूर्तीचे काम सूरज मांढरे यांच्या नियोजनामुळे मार्च अखेरपूर्वीच पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी पदावर काम करतांना हा वारसा असाच सक्षमतेने पुढे घेऊन जाण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. शासनात काम करतांना प्रत्येकाला आपल्या आवडीचे क्षेत्र मिळेलच असे नाही, परंतु आवडीच्या क्षेत्रात राज्याचे शिक्षण आयुक्त या पदावर सूरज मांढरे यांची नियुक्ती झाली आहे. या क्षेत्रात काम करतांना श्री. मांढरे नक्कीच आपला वेगळा ठसा उमटवतील यात शंका नाही, असे मत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. आज झालेल्या कार्याक्रमात उपजिल्हाधिकारी नितीन मुंढावरे, तहसिलदार प्रदीप पाटील, तलाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. उगले, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, नायब तहसिलदार श्री. मोराणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.