जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिराच्या सोळाव्या वर्धापन दिनाची उत्साहात सांगता
पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या सोळाव्या वर्धापन दिनाची उत्सहात सांगता
अरुण हिंगमीरे
जातेगांव,नांदगाव
- नाशिक जनमत नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सांगता रविवार रोजी ह.भ.प.बाळकृष्ण महाराज बूरकूल यांच्या काल्याच्या किर्तनाने दहिहंडी फोडून झाली. या सोहळ्यास रविवार दि.६ पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला होता. सालाबादप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार व प्रवचनकारांच्या ज्ञानामृताचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. यावेळी बाळकृष्ण महाराज यांनी किर्तनातून परमात्मा श्रीकृष्णाच्या लीलांचे वर्णन उपस्थित भाविकांना सांगितले, भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रातून अनेक आदर्श जीवनमूल्यांचे दर्शन घडून येते.भगवान श्रीकृष्णाच्या विविध बाललीलांचे वर्णन करुन आपल्या सुमधुर वाणीतून कृष्णलीलांवर आधारित अभंग व गौळणीद्वारे उपस्थितांना श्रीकृष्ण भक्तीत तल्लीन केले.
शनिवार दि.१२ रोजी महामंडलेश्वर स्वामी श्री.श्री.१००८ परमानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत भव्यदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या गजरात संपूर्ण गावात ग्रंथ दिंडी सोहळा काढण्यात आला होता. काल्याच्या किर्तनाच्या सांगते नंतर भाविकांसाठी ह.भ.प.सुभाष मेहतर यांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सप्ताह सोहळ्यासाठी अमूल्य योगदान देणार्या गायक, वादक, अन्नदाते आदींचा सप्ताह सोहळा समितीकडून यथोचित सन्मान करण्यात आला.या प्रसंगी परिसरातील वारकरी भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ भाविक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरील सोहळा यशस्वी होण्यासाठी येथील ग्रामपालीकेचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, श्री हनुमान भजनी मंडळ, आणि कडू पाटील, सुभाष मेहतर, सोपान खिरडकर, बाळु काटे, नाना काटे, नंदु पवार, वाल्मिक सोनवणे, संतोष सोनवणे, कारभारी बोडखे यांनी परिश्रम घेतले.