2022 साठी नाशिक विभागाला 346 कोटी चां निधी मंजूर

*
*नाशिक जनमत दि.21 जानेवारी 2022
सन 2022-23 साठी नाशिक विभागाला जिल्हा वार्षिक योजनेसाठी एकूण 1 हजार 483 कोटी रुपयांचा नियतव्यव मंजूर करण्यात आला होता. पंरतू प्रत्येक जिल्ह्याची मागणी लक्षात घेता नाशिक विभागाला एकूण 346.59 कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात येत आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत जाहीर केले.
मुंबई मंत्रालय येथून जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, उपायुक्त (नियोजन) प्रदीप पोतदार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2022-23 मधून नाशिक जिल्ह्याला 414.73 कोटी रुपयांवरुन 500 कोटी रुपयांचा नियतव्यव मंजूर करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याला 453.40 कोटी रुपयांवरुन 540 कोटी रुपयांचा नियतव्यव मंजूर करण्यात आला. धुळे जिल्ह्याला 175.9 कोटी रुपयांवरुन 225 कोटी रुपयांचा नियतव्यव मंजूर आला आहे. जळगाव जिल्ह्याला 357.50 कोटी वरुन 425 कोटीचा नियतव्यव मंजूर करण्यात आला असून नंदूरबार जिल्ह्याला 82.69 कोटी वरुन 140 कोटींचा नियतव्यव मंजूर करण्यात आला आहे. जवळपास विभागाला 346 कोटी 59 लाख रुपयांचा वाढीव निधी देण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळेत निधी खर्च करण्यास थोड्या अडचणी आल्या असून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेण्यात आली असून शंभर टक्के निधी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री.गमे यांनी यावेळी दिली. तसेच मागील दोन वर्षात विभागाच्यावतीने कोरोनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झालेला असल्याने विकास कामांसाठी निधीची कमतरता येत असून विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती विभागाच्यावतीने श्री.गमे यांनी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांना यावेळी केली.
विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी स्व.यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष महोत्सव अंतर्गत नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात सभागृहाचे बांधकाम सुरु आहे. यासाठी 12 कोटी रुपयांचा निधी शासनस्तरावरुन मंजूर झालेला आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यासाठी 4.97 कोटी रुपयांचा वाढीव निधीची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडे केली असून सदर वाढीव निधी देण्यास श्री.पवार यांनी मान्यता दिली आहे.