मातोश्री मुलींचे वसतिगृह प्रवेशासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ* *:सीमा अहिरे*
*मातोश्री मुलींचे वसतिगृह प्रवेशासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ*
*:सीमा अहिरे*”
*नाशिक दि. 30 मे, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहात प्रवेशासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा सारथीच्या उपव्यवस्थापकीय संचालक सीमा अहिरे यांनी दिली आहे.
प्रवेशासाठीचे आवश्यक निकष, अटी व शर्ती यांची माहिती सारथी https://sarathi-maharashtragov.in/ व महाज्योती https://mahajyoti.org.in/ या संकेतस्थळांवर देण्यात आली आहे. या संकेतस्थळांवर 30 जून 2023 पर्यंत अर्ज भरून अर्जाची प्रिंन्ट काढून आवश्यक कागदपत्रे स्व-साक्षांकीत करून पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्ष सारथी विभागीय कार्यालय, बॅरेक नंबर-8, विभागीय आयुक्त कार्यालय आवार नाशिकरोड,नाशिक पिन कोड -422101 या पत्त्यावर 30 जून 2023 पावेतो पाठवावेत. अधिक माहितीसाठी सारथी विभागीय कार्यालय नाशिक यांच्या 0253-2993689 या दूरध्वनी व महाज्योती विभागीय कार्यालयच्या 8087576393 या क्रमांकावर संपर्क साधावा.
मातोश्री मुलींचे वसतिगृहात 200 विद्यार्थीनींना प्रवेश देण्यात येणार आहे. यापैकी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी -मराठा लक्षित गटातील 75 मुलींसाठी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्यामार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातील 75 मुली तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 50 मुलींसाठी प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. या वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थींनींनी शासनाच्या इतर वसतिगृहांच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. वसतिगृहात प्रवेश देण्यात येणाऱ्या पात्र मुलींची यादी संबंधित सारथी, महाज्योती, उच्च व तंत्र शिक्षणविभाग यांनी कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम केल्यानंतर सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थिंनींना वसतिगृहात प्रत्यक्ष दाखल होण्याचा दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे,असेही उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी कळविले आहे.