सर्व यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे* *: मंत्री छगन भुजबळ*

*सर्व यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे*
*: मंत्री छगन भुजबळ*
*येवला व निफाड तालुक्यातील विविध विभागांची आढावा बैठक संपन्न*
*नाशिक, दि. 31 जुलै, 2023 ( वृत्तसेवा :*
सर्व विभागामार्फत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ते नियोजन करावे. अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. आज येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बैठकीस प्रांताधिकारी (निफाड) हेमांगी पाटील, प्रांताधिकारी (येवला) बाबासाहेब गाढवे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे, गटविकास अधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, तहसीलदार शरद घोरपडे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता रवींद्र पुरी, श्री. कुलकर्णी, उपअभियंता सागर चौधरी, उपअभियंता गणेश चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरद कातकाडे, येवला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे, निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. ते पुढे म्हणाले, पावसाचे प्रमाण यावेळी कमी असल्यामुळे सध्या धरणातील पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाण्याचे सुयोग्य नियोजन करावे. ज्या ठिकाणी टँकर्सची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची संख्या वाढविण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्जाचा लाभ मिळाला नाही त्यांना पीक कर्जाचा लाभ मिळण्यासाठी नियोजन करावे. खरीप हंगामाच्या दृष्टीने पीकनिहाय लागणाऱ्या खतांचा साठा मुबलक प्रमाणात ठेवावा. तसेच बोगस बियाणे व खते यांची विक्री होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले.
ते पुढे म्हणाले, विंचूरसह सोळा गाव पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनचे उर्वरित कामे १२ ऑगस्ट पर्यंत तातडीने पूर्ण करण्यात यावीत. तसेच येवला शहराला ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणी पुरेल यादृष्टीने सुद्धा नियोजन करावे. पावसाळ्यात साथरोगांबाबत आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे. साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने शहरात स्वच्छता कायम ठेवावी त्यात खंड होता कामा नये. येवला शहरातील व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबतही त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. येवला प्रशासकीय संकुलाची दुरूस्ती व डागडूजीची कामे तत्परतेने पूर्ण करणे. येवला व निफाड तालुक्यातील नवीन जाहिरमान्यानुसार स्वस्त धान्य दुकानांचे परवाने विहित कार्यपद्धतीनुसार वितरीत करून रास्त भाव दुकाने सुरू करावीत. लासलगाव बाह्य वळण रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावे. आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेळेत पुर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या.
*येवला शहर पोलिस स्टेशन कामाची मंत्री भुजबळ यांनी केली पाहणी*
येवला शहरात सुरू असलेल्या येवला शहर पोलिस स्टेशनच्या कामाची राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, येवला शहर पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते
*मंत्री श्री.भुजबळ यांनी केली आपला दवाखाना केंद्र जागेची पाहणी*
येवला शहरात जुने तहसील कार्यालय परिसरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या जागेची मंत्री श्री. भुजबळ यांनी पाहणी करून सदर दवाखाना १ महिन्यात कार्यान्वित करण्याचे निर्देश यावेळी दिले.
०००००