शेतकरी संकटात असताना विमा कंपन्या मोबदला देत नाही. राजू शेट्टी.
शेतकरी संकटात असताना विमा कंपन्या मोबदला देत नाही – राजू शेट्टी
शेतकरी संकटात सापडला असतांना विमा कंपन्या मोबदला देत नाही. प्रशासनावर आणि विमा कंपन्यांवर सरकारचा वचक राहिलेला नाही. हजारो कोटींचा नफा विमा कंपन्यांना होत आहे याची चौकशी केंद्र आणि राज्य सरकारने केली पाहिजे पण तसे होत नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका करतांना केली.
नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शेट्टी यांनी सरकारसह विरोधीपक्षाचाही चांगलाच समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, शेतकरी हताश झाला आहे. संतापलेला आहे. उडीद, मूग, भुईमूग, कापूस, सोयाबीन, कांदा, मका, भात शेत पिकांची मोठे नुकसान झाले आहे. रब्बीला उशीर झाला आहे. वर्ष कसे काढायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वत्र पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. सरकारने पंचनाम्यांचे नाटक बाजूला ठेवले पाहिजे. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये तलाठी, कृषिसेवक एकरी चारशे रुपये मागतो. तरी कारवाई होत नाही. प्रशासनावर आणि विमा कंपन्यांवर सरकारचा वचक राहिलेला नाही. विमा कंपन्यांनी दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम द्यायला पाहिजे होती पण दिले नाही. कंपन्यांना जाब विचारायची सरकारला हिम्मत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नैसर्गिक आपत्ती आल्यावर विमा कंपन्या तोट्यात, दिवाळखोरीत निघायला पाहिजे होत्या पण उलट असे झाले की, हजारो कोटींचा नफा विमा कंपन्यांना होत आहे. हा नफा तोंडात बोट घालायला लावणारा आहे. केंद्र आणि राज्य सरकार याची चौकशी केली पाहिजे पण तसे होत नाही. प्रधानमंत्री फसला बिमा योजना ही जणू प्रधानमंत्री कॉर्परेट योजना झाली असल्याची टीका त्यांनी केली.
सरकारसह विरोधीपक्षावर टीकास्त्र…
शेतकरी नडला जात असताना विरोधीपक्षाने रान उठवायला पाहिले होते, पण भेदरलेला विरोधीपक्ष चकारशब्द बोलायला तयार नाही. ईडी, सीबीआयमधून आपला बचाव कसा करायचा यात विरोधीपक्ष आणि त्यांचे नेते मश्गुल आहे. जे सत्तेत आहे, त्यांना काहीच देणे घेणे नाही. ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता. पण पंचनाम्यांचे नाटक काढले गेले. त्यात शेतकऱ्यांना नाडले जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करतांना दिसत आहे. एकमेकांचे कपडे उतरवणे, एकमेकांना बघून घेण्याची भाषा करणे यातच सर्व राजकीय पक्ष आणि नेते मश्गुल आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला कोणाला वेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मानत असंतोष उद्रेक उफाळून येत आहे
काटामारीतून उभा केला जातो कोट्यवधींचा काळा पैसा…
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गंडवले जाते. ऊसात काटामारी केली जात आहे. या काटामारीत सुमारे ४ हजार ६०० कोटीं रुपयांची साखर तयार होते. यातून काळा पैसा तयार होतो. हा सगळा काळा पैसा निवडक दोनशे साखर कारखानदारांच्या घरात जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ही सर्व दरोडेखोरी आहे. ही महाराष्ट्रात संघटित दरोडेखोरी आहे. या दरोडेखोरीला आळा घालायला शासनाने पाऊल उचलले पाहिजे, पण शासन तसे करत नाही. पेट्रोलपंपावर तेल चोरी होऊ नये यासाठी जसे संगणकीकरण, सॉफ्टवेअर तयार केले, तशी प्रणाली राज्यातल्या दोनशे कारखान्यांच्या वजनकाट्यांवर बसवले पाहिजे ही आमची मागणी आहे. हे वजनकाटे नियंत्रणात आणण्याचे सरकारने प्रयत्न करायला पाहिजे पण सरकारमध्ये साखर सम्राटांचा भरणा जास्त असल्याने तसे होतांना दिसत नाही. कोणतेही सरकार हे साखर कारखानदारांच्या बाजूनेच असते. ही साखर कारखानदार मंडळी मोठी मोसमतज्ञ असतात असा टोला यावेळी शेट्टी यांनी लगावत ज्या बाजूने सरकारची हवा तिकडून ते सत्तेत राहतात त्यांना केवळ सत्ता पाहिजे. शेतकऱ्यांची लूट करायची असते. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू घेण्यासाठी उद्या राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा साखर आयुक्तांच्या कार्यालयावर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले