रेल्वे प्रवासात दोन आमदारांचा मोबाईल चोरीला. रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल.
रेल्वे प्रवासात दोन आमदारांचा मोबाईल चोरीला.मालेगाव मधून 1 संशयित ताब्यात
मनमाड :नाशिक जनमत रेल्वे प्रवासादरम्यान चोरीचे प्रमाण वाढले आहे याचा फटका दोन आमदारांना बसला असून त्यांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान रात्रीच्या सुमारास दोन आमदारांचे महागडे मोबाइल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून, याबाबत रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्यां रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. रेल्वे प्रवासाला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये चोरीचे प्रमाणही वाढले आहे. मनमाड-नाशिक प्रवासादरम्यान भाजपच्या दोन आमदारांचे मोबाइल व वस्तू चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दरम्यान या दोन्ही घटना मनमाड- नाशिक दरम्यान धावत्या रेल्वेत घडल्या आहेत. पहिली घटना देवगिरी एक्स्प्रेसमध्ये घडली असून,
या रेल्वेतून परभणी जिल्हातील जिंतूरच्या साकोरे-बोर्डीकर करीत असताना त्यांचा मोबाइल चोरीला गेला. या चोरीप्रकरणी मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरी घटना नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये घडली असून, या रेल्वेतून नांदेड येथील विधान परिषदेवरील भाजप आमदार राम पाटील रातोळीकर हे प्रवास करीत असताना चोरट्यांनी मनमाड येथे त्यांचा व त्यांच्या सहायकाचा मोबाइल लंपास केला. तर सहप्रवाशाच्या कॅश असलेल्या पर्सवरही डल्ला मारला. ही बाब नाशिक येथे लक्षात आल्याने हा गुन्हा नाशिकरोड रेल्वे पोलिसांत दाखल करण्यात आला. याप्रकरणी मालेगाव येथून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याच्याकडून आमदारांचा मोबाइल मिळाला नाही. मात्र, आमदाराच्या सहायकाचा मोबाइल व रक्कम असलेली पर्स संशयिताकडे मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री रेल्वे पोलिसांनी डब्यामध्ये गस्त वाढावी असे प्रवासवर्गांची मागणी आहे.
या मोबाइल चोरीच्या घटना केवळ आठ दिवसाच्या अंतराने घडल्या आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान चोरी होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीची मनी पर्स चोरट्यांनी लंपास केली होती तर माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांचेही पाकीट चोरट्यांनी मनमाड येथे लंपास केल्याची घटना घडली होती. त्यावेळी पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यानंतर आता आमदारांच्या बाबतीत अशी घटना घडल्यामुळे रेल्वे प्रवासात व्हीआयपी व्यक्तींचे सामान चोरीस जात असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.