ब्रेकिंग

मविप्र केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय मुलांच्या वसतिगृहाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवार दि. २६ रोजी उद्घाटन* -.

*१३ मजली भव्य वास्तू ठरणार संस्थेच्या कार्यातील महत्त्वपूर्ण टप्पा : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे*

*नाशिक :जनमत  * मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या संस्थेच्या वतीने गंगापूर रोडवरील उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय मुलांच्या वसतिगृहाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी 2.30 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक सुविधांनी युक्त निवासव्यवस्था परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेली ही १३ मजली भव्य वास्तू संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. संदीप गुळवे, रमेश पिंगळे आदींसह मविप्रचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ, पालकमंत्री नाशिक तथा महाकुंभमेळा मंत्री गिरीष महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, विशेष अतिथी म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, खा. डॉ. शोभाताई बच्छाव, खा. भास्करराव भगरे, आमदार डॉ. राहुल आहेर, ॲड. माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, सीमाताई हिरे, ॲड. राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे, सुहास कांदे, नितीन पवार, सरोजताई अहिरे, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, सत्यजित तांबे, आमदार गोकुळ गिते, मुफ्ती मोहम्मद, किशोर दराडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ॲड. ठाकरे यांनी सांगितले कि, आजही गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, कुणबी आणि बहुजन समाजातील हजारो विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नाशिकमध्ये येतात. अशा विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात उत्तम निवासव्यवस्था उपलब्ध व्हावी, खासगी निवासव्यवस्थेमुळे त्यांच्यावर आर्थिक भार पडू नये आणि त्यांना शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता यावे, या उद्देशाने संस्थेच्या कार्यकारिणीने या भव्य वसतिगृहाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. संस्थेच्या ११२ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीत विद्यार्थीहित, सामाजिक बांधिलकी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. या वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार असून, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक अनुकूल वातावरण उपलब्ध होणार आहे. कष्टकरी, शेतकरी आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देणाऱ्या या वास्तूचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते होत असल्याने मराठा विद्या प्रसारक समाजासाठी हा गौरवाचा क्षण आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी संस्थेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संस्थेचे सन्माननीय सभासद, स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, सेवक, पालक, विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, ॲड. संदीप गुळवे, डॉ. सयाजीराव गायकवाड, इंजि. अमित बोरसे, ॲड. रमेशचंद्र बच्छाव, कृष्णाजी भगत, रमेश पिंगळे, रवींद्र देवरे, प्रवीण जाधव, शिवाजी गडाख, डॉ. प्रसाद सोनवणे, नंदकुमार बनकर, विजय पगार, शालन सोनवणे, शोभा बोरस्ते, प्रा. डॉ. संजय शिंदे, चंद्रजीत शिंदे, जगन्नाथ निंबाळकर यांनी केले आहे.
——————————————————————–
*झाडांचे जपले अस्तित्व*
वसतिगृहाच्या जागेमध्ये काही जुनी वृक्षे आहेत. मात्र इमारतीच्या बांधकामादरम्यान एकाही झाडाची कत्तल होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे झाडे तोडावी लागू नये, ही बाब लक्षात घेऊन इमारतीचे डिझाईन करण्यात आले आहे. या झाडांभोवती सुशोभीकरण करून अधिक संरक्षित करण्यात आले आहे. उद्घघाटनाचा कार्यक्रमदेखील याच परिसरात होणार आहे.
*६०० हून अधिक विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था*
या इमारतीचे भूमिपूजन सोमवार, दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी तत्कालीन जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर संस्थेने या वसतिगृहाच्या उभारणीचे काम हाती घेतले. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत १३ मजली भव्य इमारत उभी राहिली असून, विद्यार्थ्यांच्या निवासाच्या गरजा लक्षात घेऊन या वास्तूमध्ये विविध आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. या वसतिगृहाचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ७,४०० चौरस मीटर असून, बांधकामासाठी अंदाजे ३१ कोटी ५० लाख रुपये खर्च झाला आहे. इमारतीमध्ये एकूण १४३ खोल्यांची व्यवस्था असून, ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना निवासासोबतच दैनंदिन गरजांसाठी आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे.
——————————————————————–
*राजर्षी शाहू महाराजांनी दिली १५ हजारांची देणगी*
मराठा विद्या प्रसारक समाजाची सुरुवात १९१४ मध्ये एका वसतिगृहाच्या माध्यमातून झाली. शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याच्या ध्येयाने सुरू झालेल्या या कार्याला राजर्षी शाहू महाराजांनी १९२० मध्ये वार्षिक १५ हजार रुपयांची देणगी देऊन प्रोत्साहन दिले. त्यानंतर संस्थेचे वसतिगृह स्वतःच्या मालकीच्या जागेत उभे राहिले आणि त्याचे उद्घाटन राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते झाले. अवघ्या पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या संस्थेच्या शैक्षणिक प्रवासाने अनेक पिढ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली आहे.


————————————————————————————————————
*वसतिगृहातील प्रमुख वैशिष्ट्ये व सुविधा पुढीलप्रमाणे :*
1. १३ मजली भव्य इमारत : विद्यार्थ्यांच्या निवासासाठी प्रशस्त व सुसज्ज वास्तू.
2. ६०० हून अधिक विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था : विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आवश्यक सुविधा.
3. एकूण १४३ खोल्या : प्रत्येक खोलीमध्ये स्वतंत्र शौचालय व स्नानगृह.
4. सुरक्षिततेची व्यवस्था : वसतिगृहाच्या देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे.
5. स्वतंत्र भोजन व्यवस्था: तळमजला व पहिल्या मजल्यावर विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था.
6. २४ तास गरम पाण्याची सुविधा : विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापरासाठी गरम पाणी.
7. शुद्ध पिण्याचे पाणी : फिल्टर केलेले पाणी उपलब्ध.
8. लिफ्ट सुविधा : मजल्यांदरम्यान सहज व सोयीस्कर ये-जा करण्यासाठी.
9. लॉन्ड्री सुविधा : विद्यार्थ्यांचे कपडे धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.
10. जिमखाना सुविधा : विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा व मनोरंजनासाठी.
11. टेरेस सुविधा : उपलब्ध जागेचा विविध उपयुक्त उपक्रमांसाठी वापर.
12. इमारतीचे क्षेत्रफळ : अंदाजे ७,४०० चौरस मीटर.
13. बांधकाम खर्च : अंदाजे ३१ कोटी ५० लाख रुपये.
———————————————-
*
*नाशिक : मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. समवेत सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. संदीप गुळवे, रमेश पिंगळे यांसह शिक्षणाधिकारी.*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे