ब्रेकिंग

शंखनादाच्या विश्वविक्रमाने दुमदुमला गोदाकाठ!*५१७ जणांच्या सामूहिक शंखनादाने नाशिकच्या नावे इतिहास; अमेरिकेचा ३०३ शंखवादकांचा विक्रम मोडला

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी

 

नाशिक, दि. २५ ऑक्टोबर नाशिक जनमत वृत्तसेवा) : “अभिनंदन! तुम्ही एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे!” गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी ही घोषणा करताच गोदावरीचा पवित्र तीर ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. अमेरिकेचा एकाचवेळी ३०३ शंखनाद करण्याचा पूर्वीचा विक्रम मागे टाकत ५१७ व्यक्तींनी सामूहिक शंखनाद केल्याने नाशिकच्या नावे एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली. भक्ती, श्रद्धा, सामूहिक शक्ती आणि भारतीय संस्कृतीचा गौरव अधोरेखित करणाऱ्या या सोहळ्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी ठरली.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर यशवंत महाराज पटांगण, गोदाकाठ येथे या सामूहिक शंखनादाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमात शंखनादाच्या निनादाने परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. गोदावरीच्या तीरावर एकाच वेळी घुमलेल्या शंखध्वनीने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवित सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला.

या वेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नियोजन विभागाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग, समन्वयक मिलिंद बेर्लेकर, अनंत विजय शंखनाद पथकाच्या वृषाली घोलप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,
यांच्यासह साधू-महंत, शंखनाद वादक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*नाशिकच्या यशाने महाराष्ट्राच्या लौकिकात भर*

सामूहिक शंखनादाचा विक्रम प्रस्थापित झाल्यानंतर पालकमंत्री श्री. महाजन यांनी सहभागींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. हा उपक्रम केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, देशाच्या लौकिकात भर घालणारा आहे. अशा उपक्रमांमधून भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सामूहिक सहभागाची ताकद जगासमोर येते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

शंखनाद हा भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मंगलकार्य, धार्मिक विधी आणि आध्यात्मिक उपासनेमध्ये शंखनादाला विशेष महत्त्व आहे. अशा परंपरेला विश्वविक्रमाची जोड देण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये साकार झाला. शेकडो नागरिकांनी एकाच वेळी शंखनाद करण्यासाठी दाखविलेली तयारी, शिस्त आणि उत्साह ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये ठरली. सर्व सहभागींचे योगदान कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी नमूद केले.

 

*निर्धारित निकषांनुसार पडताळणी*

कार्यक्रमादरम्यान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी विश्वविक्रम नोंदविण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. एकाच वेळी सर्वाधिक व्यक्तींनी शंखनाद करण्याचा यापूर्वीचा विक्रम ३०३ व्यक्तींचा होता. तो मोडण्यासाठी निर्धारित नियमांनुसार त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी शंखनाद करणे आवश्यक होते. या उपक्रमासाठी ५०० हून अधिक जणांनी नोंदणी केली होती. सहभागींच्या नोंदी, प्रत्यक्ष सहभाग आणि निर्धारित निकषांनुसार केलेल्या कामगिरीची पडताळणी दोन निरीक्षकांकडून करण्यात आली.

 

शंख वाजविणे ही केवळ धार्मिक कृती नसून त्यासाठी श्वसनावर नियंत्रण, नियमित सराव, प्राणायाम आणि शारीरिक क्षमता आवश्यक असते. त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागींचा समन्वय साधून सामूहिक शंखनाद करणे हे आव्हानात्मक काम होते. नाशिकमध्ये या उपक्रमासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित एकजुटीचे दर्शन घडविले. सामूहिक प्रयत्नांतून साध्य झालेल्या या कामगिरीमुळे नाशिकच्या सांस्कृतिक ओळखीला नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली.

*सिंहस्थ कुंभमेळा हा प्रत्येक नाशिककराचा सोहळा*

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. महाजन यांनी नागरिकांना या ऐतिहासिक पर्वाच्या तयारीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ शासनाचा, प्रशासनाचा, लोकप्रतिनिधींचा किंवा पोलिसांचा कार्यक्रम नसून प्रत्येक नाशिककराचा सोहळा आहे. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे ज्या आपुलकीने स्वागत केले जाते, त्याच भावनेने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा सन्मान केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

आगामी कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रस्ते, घाट, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, वाहतूक, निवास, भोजन आणि भाविकांना मार्गदर्शन अशा विविध बाबींचे नियोजन महत्त्वाचे आहे. प्रशासन विविध पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामात कार्यरत असून नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, स्वयंसेवक आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना योग्य माहिती मिळावी, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि नाशिकमधील वास्तव्य सुखकर व्हावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाशिकची स्वच्छता, सुंदरता आणि नागरिकांचे प्रेमळ आदरातिथ्य या बाबी भाविकांच्या स्मरणात राहाव्यात, हीच या सोहळ्याच्या यशाची खरी कसोटी असेल, असेही त्यांनी नमूद केले.

*३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण; सिंहस्थ पर्वाच्या तयारीला गती*

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील रामकुंडावर दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथेही त्याच वेळी ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी उत्साहाने पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. महाजन यांनी केले.

यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शंखनाद मध्ये सर्व सहभागींचे मनःपूर्वक अभिनंदन. हा विक्रम केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, देशाच्या लौकिकात भर घालणारा आहे.

 

 

 

असे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान  गोदावरी वरील विकास कामे अपुरी असल्याने व खोत कामे मोठ्या प्रमाणात असल्याने नाशिककरांना खूप त्रास सहन करावा लागला. दुपारी चार वाजेपासून आलेले नागरिकांना गोदावरीच्या दुसऱ्या काठावरून हा कार्यक्रम भक्तांना शंख नादाचा आवाज काही नागरिकांना आला नसल्याचे नाशिक कारनि बोलून दाखवले. कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी

रस्ते बंद असल्याने कार्यक्रमाला कोणत्या बाजूने जावे हेच समजत नव्हते. काही जणांना कार्यक्रमास येऊन मन संताप झाल्याचे काही महिलांनी बोलून दाखवले.

पोलीस बंदोबस्त क** असला तरी. नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन न केल्याने नागरिकांना रस्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी शोधावे लागले. पत्रकारांना देखील पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही दोन तास अगोदर आले पाहिजे होते. असे सांगितले. एकीकडे व्हीआयपी अधिकारी मंत्र्यांनी कार्यक्रमाचा खुर्चीवर बसून मनसोक्त आनंद घेतला. परंतु नाशिककरांना साधा उभे राहण्यास देखील जागा न मिळाल्याने लाऊड स्पीकर च्या आवाजावर समाधान मानावे लागले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे