– राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करणे कामी सिटी टास्क फोर्स ची बैठक संपन्न…

विषय- राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करणे कामी सिटी टास्क फोर्स ची बैठक संपन्न…
नाशिक जनमत नाशिक महापालिकेच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम शहरात दि. २७ ऑक्टोबर रोजी व मॉप अप दिन ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंर्तगत १ ते १९ वयोगटातील लाभार्थाना अल्बेडेझॉलची गोळी (जंतनाशक) देण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत शेटे यांनी दिली.१ ते १९ वर्ष वयोगटातील किमान २८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे.बालकांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशातून जंतनाशक मोहीम राबविण्यात येते. बालकांमध्ये आढळून येणारा जंतदोष हा साधारण वाटत असला, तरी त्याचे वाईट परिणाम आरोग्यावर दिसून येतात. जंतदोषामुळे बालकांना अॅनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो. शिवाय, आतड्यावर सूज येणे, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार, पोटदुखी आदी आजार डोके वर काढतात. हा दोष टाळण्यासाठी बालकांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी देणे गरजेचे आहे. याअनुषंगाने आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोन वेळा विशेष मोहीम राबविली जाते. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. तसेच बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेऊन १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व शाळेल विद्यार्थी यांना शाळा व अंगणवाडीकेंद्र स्तरावर गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्तिथी व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उल्लेख आहे. ही मोहीम शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. १ ते २ वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी २०० मिलिग्रॅमची गोळी चुरा / पावडर करूनच पाण्याबरोबर देण्यात येईल.२ ते १९ वयोगटातील मुला- मुलींना ४०० मिलिग्रॅमची गोळी चुरा अथवा तुकडे करून चावून खाण्यास स्वच्छ पाण्याबरोबर देण्यात येणार आहे. अल्बेडेझॉल ची गोळी उपाशीपोटी देण्यात येणार नाही. गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. तथापी जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा कचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते, हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये.तुमच्या १९ वर्षांआतील मुलांचे सतत पोट दुखत असेल, तर त्यांना जंतांचा त्रास असू शकतो. जंतामुळे मुलांना पोटदुखी, अॅनिमियासारख्या आजारांचा धोका उद्भवू

शकतो.याबाबत माहिती डॉ. शेटे यांनी दिली.टास्क फोर्स ची बैठक आयुक्त मनिषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीस अतिरिक आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त नितीन नेर,वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉ. प्रशांत शेटे,शिक्षण अधिकारी मिता चौधरी, सहा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,सर्व मनपा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, विभागीय वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.


