आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी* *जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश*
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025*
*आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी*

*जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश*
*नाशिक, जन्मत दिनांक 11 नोव्हेंबर, 2025 : जिल्ह्यातील अकरा नगरपंचायत/नगरपरिषद/ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका नि:ष्पक्ष व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील नगरपंचायत/नगरपरिषद/नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था व आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हादंडाधिकारी श्री. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (ग्रामीण), निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन श्याम गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, जिल्ह्यातील ११ नगरपंचायत/ नगरपरिषद/ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तसेच विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. मतदारांना मतदान निर्भय व भयमुक्त वातावरणात करता यावे म्हणून पोलिस बंदोबस्त नियुक्त करावा. आवश्यक तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. मतदारांना मतदान केंद्रांवर पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी जनजागृती करावी. त्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले की, पोलिस विभाग सतर्क असून मतदान केंद्रनिहाय बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासनाचे सहायक आयुक्त श्री. गोसावी यांनी मतदान तयारीबाबत माहिती दिली.
