आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त*रॅली व परिसंवादाचे आयोजन.
दिनांक: 02 डिसेंबर, 2022
*आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त*
*रॅली व परिसंवादाचे आयोजन*
*नाशिक, दिनांक 02 डिसेंबर, 2022 (जि.मा.का. वृत्तसेवा):*
पौष्टीक तृणधान्यांचे आहारातील महत्व लक्षात घेवून 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात 5 डिसेंबर 2022 रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून 6 ते 10 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात परिसंवादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे.
बाजरी, ज्वारी, नाचणी, वरई, राळा या पौष्टीक तृणधान्य पिकांची माहिती, त्यांचे आहारातील महत्व, पाककला, प्रक्रिया पदार्थ याविषयी शेतकरी तसेच शहरी व ग्रामीण भागात जगजागृती व्हावी यादृष्टीने 5 डिसेंबर 2022 रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहरातील डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित कृषी महोत्सवात 7 डिसेंबर 2022 रोजी पौष्टीक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व भविष्यातील संधी, पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व, पौष्टीक तृणधान्य प्रक्रियेतील विविध संधी याविषयी परिसंवादाचे आयोजन केले आहे. पौष्टीक तृणधान्याच्या विविध पाककृती यांचे स्वतंत्र दालन कृषी महोत्सवात ठेवण्यात आले आहे.
परिसंवाद कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र,कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञ तसेच प्रगतशील शेतकरी व उद्योजक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी, नव उद्योजक यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात असणार आहे. कृषी महोत्सवात शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे व आत्मा चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले आहे.