मुसळधार पावसानंतर उच्चस्तरीय पाहणी; गिरीश महाजन, महापौर, आयुक्त व पोलीस आयुक्त यांनी घेतला परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा.

मुसळधार पावसानंतर उच्चस्तरीय पाहणी; गिरीश महाजन, महापौर, आयुक्त व पोलीस आयुक्त यांनी घेतला परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा
नाशिक :जनमत शहरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने कुंभक्षेत्रातील संवेदनशील ठिकाणांची आज उच्चस्तरीय पाहणी करण्यात आली.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामकुंड, जुने नाशिक, ऐतिहासिक वाडे, होळकर पूल, वाघाडी नदी परिसर, गंगा घाट तसेच सराफ बाजार परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
रामकुंड परिसरात गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीची पाहणी करण्यात आली. घाट परिसरातील सुरक्षाव्यवस्था, पावसाच्या पाण्याचा प्रवाह, भाविकांच्या हालचालींसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना तसेच सुरू असलेल्या विकासकामांवर पावसाचा झालेला परिणाम याची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
त्यानंतर जुने नाशिक परिसरातील ऐतिहासिक वाड्यांची पाहणी करण्यात आली. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जुन्या वास्तूंवर निर्माण होणारा ताण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. धोकादायक इमारतींवर सातत्याने लक्ष ठेवून गरज भासल्यास तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
होळकर पूल, वाघाडी नदी परिसर, गंगा घाट आणि सराफ बाजार परिसरात पावसाळी परिस्थिती, पाण्याचा निचरा, वाहतुकीची स्थिती तसेच सुरू असलेल्या विकासकामांचीही पाहणी करण्यात आली. पावसामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यरत राहावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


रामकुंड, होळकर पूल आणि परिसराची पाहणी पूर्ण झाल्यानंतर शिष्टमंडळाने एबीबी सर्कल येथे भेट देऊन मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पाणी साचण्याच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पावसाच्या पाण्याचा निचरा काही ठिकाणी अडथळ्यांमुळे प्रभावित होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ ड्रेनेज लाईनमधील अडथळे दूर करून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याच्या तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आणि संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली.
त्यानंतर पिंपळगाव बहुला रस्त्याचीही पाहणी करण्यात आली. या परिसरात पावसामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, पाणी साचण्याची समस्या तसेच नागरिकांना होत असलेल्या गैरसोयींचा आढावा घेण्यात आला. वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याबरोबरच पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले..
पाहणी करण्यात आलेली ठिकाणे :
रामकुंड परिसर
रामकुंड येथील सुरू असलेली विकासकामे
जुने नाशिक
ऐतिहासिक जुने वाडे
होळकर पूल
वाघाडी नदी परिसर
गंगा घाट
सराफ बाजार
एबीबी सर्कल (पाणी साचलेल्या भागाची पाहणी)
पिंपळगाव बहुला रस्ता (वाहतूक व पाणी साचलेल्या भागाची पाहणी)
“गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक संवेदनशील ठिकाणी प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. ज्या ठिकाणी पाणी साचण्याच्या किंवा पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत, तेथे तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील मूलभूत सुविधा अखंडित ठेवणे हेच महानगरपालिकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे.असे ” महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितलं.



