सिन्नरला स्कूटीच्या डिक्कीतून ३ लाख लांबविले
सिन्नर : नाशिक जन्मत प्रतिनिधी सिन्नर मधील
वावीवेस परिसरात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा स्कूटीच्या डिक्कीतून तीन लाखांची रोकड लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, डिक्कीतून पैसे चोरताना चोरटा सिसीटीव्हीत कैद झाला असून, दुसरा चोरटा पाळत ठेवत असल्याचे दिसून आले. या घटनेने सणासुदीच्या दिवसांमध्ये चोरटे आपली दिवाळी साजरी करत असताना दिसून आले आहेत. नाशिक शहरातील सातपूर परिसरात देखील एकाच दिवसात आठ घर फोडी च्या घटना झाले आहेत.
शहरातील विजयनगर परिसरात वास्तव्यास असलेले गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर पंकज गणपत जाधव (४२) त्यांच्याकडे काम करणाऱ्या मजुरांचा पगार करण्यासाठी
विजयनगर येथील नवीन कोर्टासमोर असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतील आपल्या खात्यातून तीन लाख रुपये काढून दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या टीव्हीएस ज्युपिटर स्कूटीच्या (क्र. एमएच १५, एफझेड-४६३२) सीटखाली असलेल्या डिक्कीत ठेवले व तेथून वावीवेस येथील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये त्यांच्या ड्रायव्हरचा डबा आणण्यासाठी गेले.
हॉटेलसमोर स्कूटी उभी करून डबा घेण्यासाठी आत गेले व काही वेळानंतर डबा घेऊन पुन्हा त्यांच्या
घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांनी पैसे काढण्यासाठी सीटखालील डिक्की उघडली असता, त्यातील पैसे गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
जाधव यांनी तत्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात फोनद्वारे माहिती दिली व हॉटेल अन्नपूर्णा येथे जात हॉटेलचे मालक बाळा गोळेसर यांना चोरी झाल्याचे सांगत त्यांच्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. त्याचवेळी पोलिसही तेथे पोहोचले. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील डोक्यावर फिकट
निळसर रंगाची टोपी, अंगात राखाडी रंगाचा चौकट असलेला पांढरा शर्ट व स्पोर्ट्स पॅन्ट असा पेहराव असलेला एक इसम जाधव यांच्या स्कूटीची डिक्की खोलून पैसे चोरत असल्याचे आढळून आले. त्याच्यासोबत डोक्यात हेल्मेट व काळ्या रंगाचा वेश असलेला दुसरा चोरटा जाधव यांच्यावर पाळत ठेवून असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी जाधव यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.